Saturday, August 22, 2020

माझ्या राजाचा नयनमनोहर राज्याभिषेक सोहळा

माझ्या राजाचा नयनमनोहर राज्याभिषेक सोहळा एकेकाळी महाराष्ट्राचे वैभव म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राला लाजवणारं! महाराष्ट्राचे हे वैभव ऐकून दिल्लीच्या सुलतानाचे लक्ष दक्षिण भारताकडे म्हणजेच आपल्या महाराष्ट्राकडे गेले.इ. स 1294 मध्ये इस्लामी सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या यादव साम्राज्यावर पहिला हल्ला केला. अल्लाउद्दीन खिलजीच्या या स्वारीनंतर पुढील तीनशे वर्षात महाराष्ट्राला मोगल,आदिलशहा, निजामशहा,पोर्तुगीज,इंग्रज,डच व सिद्धी या परकीयांनी गुलाम केले. दिल्ली सुलतान अल्लाउद्दीन पुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य इ.स 1318 मध्ये कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष गुलामगिरीची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य,गुलामी,अवहेलना,दुःख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता.या काळोखातच शिवनेरी किल्ल्यावर सोनेरी पहाट झाली.अन् शहाजीराजे व जिजामाता यांच्या पोटी वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी 'शिवाजी' नावाच्या ताऱ्याचा जन्म झाला. गुलामगिरी आणि पारतंत्र्याच्या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शिवरायांनी पेटविली. महाराष्ट्रातील गोरगरीब,सर्वसामान्य,अठरापगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांच्या साह्याने शिवरायांनी परकीय शत्रूंविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभा करून गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत बनवली. तसेच त्यांच्यासोबत असलेले तरुण मावळे तसेच वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले सरदार यांना त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाने आपलेसे केले. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्ती मध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रूंनी अडथळे निर्माण केले होते.त्यांचे शत्रूही त्यांच्यापेक्षा कितीतरी पट बलशाली होते.त्यात केवळ हिंदुस्थानातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे, विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश,आदिलशाह,निजामशाह कुतुबशाह,पोर्तुगीज,इंग्रज,फ्रेंच व सिद्धी यांच्या जोडीला स्वकीयांचे शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते, पण शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक शत्रूचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांच्या बलस्थानांबरोबरच दुर्बल बलस्थानांचा अभ्यास करून आपल्या उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली सर्व शत्रूंना नामोहरम करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे,शिवा काशिद मुरारबाजी व बहिर्जी नाईक यासारखे अनेक सखे-सोबती,हजारो मावळ्यांच्या,सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र भूमी पावन झालीच व स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार झाले. जिजाऊ माँसाहेबांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न पूर्ण झाले, पण त्या स्वराज्याचे शिवाजी महाराज हे अधिकृत सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यामुळे स्वराज्यातील लोकांनाही हे खरे राज्य नव्हे,असे वाटत असे. आपल्या जमीन-जुमल्याबाबतचे वतन वृत्तीचे कागद बादशहाच्या शिक्कामोर्तबाचेच असावे,असे त्यांना वाटे.कारण हे स्वराज्य काल-परवा निर्माण झाले आहे,उद्या जर हे स्वराज्य बुडाले तर आपल्या जमीन-जुमला याची शाश्वती काय? शिवाजी राजे चांगले आहेत,त्यांच्या अंमलासारखे सुख कोठेच नाही,राजे धर्मपरायण आहेत, पण ते आणखी खरे राजे नाहीत,अशी सर्वसामान्य रयतेची भावना होती.स्वराज्यातील प्रजेला अजून स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झालेला नव्हता.स्वराज्य असूनही ते अधिकृत नव्हते.याशिवाय अनेक विद्वान,कवी, शास्त्री,पुराणिक,योद्धे,मुत्सद्दी महाराजांच्या पदरी निष्ठापूर्वक सेवा करीत होते आणि महाराजांना देवरूप मानत होते. तरीपण स्वकीय जनता व परकीय सत्ताधीश यांना शिवाजी महाराज हे मराठ्यांचे सार्वभौम राजे व स्वराज्य हे मराठ्यांचे सार्वभौम राज्य आहे असे वाटत नव्हते.त्यासाठी सर्व सामान्य प्रजा,राजदरबारी,सेवक- सरदार व सरसेनापती तसेच देवा ब्राह्मणांच्या साक्षीने राज्याभिषेकासारखा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न करून स्वतःचे व राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करावयाचे ठरविले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. राज्याभिषेक सोहळ्याची रायगडावर तयारी सुरू झाली अन् महाराष्ट्राला चाहूल लागली राज्याभिषेक सोहळ्याची. या सोहळ्यासाठी रायगड सजला,भगव्यांनी नटला.ताठ मानेने अन् अभिमानाने त्या गगनाकडे बघून सांगू लागला,"बघा,आज शिवाजी महाराज 'राजे'होत आहेत आणि 'स्वराज्य' नावाच्या मंदिरावर भगवा कळस चढवला जातोय." हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातील राजे-महाराजे रायगडावर पोहोचले. गंगा, यमुना,गोदावरी,सिंधू,कृष्णा नर्मदा,कावेरी या सप्त नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर आणले गेले. सर्व वातावरण आनंदित होते. स्वराज्याच्या मातीचा कणकण हर्षित झाला होता.अखेर 6 जून 1674 हा दिवस उजाडला.रायगडावर सनई-चौघडे वाजू लागले.सकाळी- सकाळी शिवाजी महाराजांच्या मस्तकावर गागाभट्टांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक झाला.नंतर माँसाहेबांचे दर्शन घेऊन शिवाजी महाराज सिंहासनावर बसले.महाराष्ट्राचे स्वराज्यस्थापक,महाराष्ट्रातील आई- बहिणीचे रक्षक,आपल्या बायकापोरां अगोदर ज्या मावळ्यांना स्वराज्याचा भगवा दिसायचा त्या मावळ्यांचे, स्वराज्यातील प्रजेचे,अठरापगड जातीचे,माँसाहेबांचे,संभाजी राजांचे आबासाहेब शिवाजी महाराज 'सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज' झाले. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतल्यामुळे त्यांच्याबद्दल निरनिराळ्या सुलतानशाह्यांवर नैतिक दबाव निर्माण झाला. शिवाजीराजे हे एक स्वतंत्र सार्वभौम राजे आहेत व स्वराज्य हे सार्वभौम राज्य आहे,हे सर्वांनाच मान्य करावे लागले. त्यानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी जे कायदे,नियम,अटी व शिष्टाचार तयार केले होते.त्यांना रयतेची मान्यता मिळाली. राज्य प्रशासन चालविण्यासाठी तयार केलेल्या आचारसंहितेस मान्यता मिळाली. शिवाजी महाराज राजपत्रावर 'क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती' असा निर्देश करू लागले. राज्यरोहणाच्या घटके पासून 'राज्याभिषेक शक' ही कालगणना सुरू झाली अन् शिवाजीराजे 'शककर्ते राजे' बनले.याप्रसंगी त्यांनी तांब्यांची 'शिवराई'व सोन्याची 'शिवराई होन अशी खास 'श्रीराजा छत्रपती अशा ठशांची शिवराई नाणी 'चलन'म्हणून तयार केली. शिवराज्याभिषेक यामुळे राजवटीला स्थैर्य प्राप्त झाले. प्रशासनाच्या कारभारात सुसूत्रता निर्माण झाली.मुलकी व फौजदारी कायदे सर्वांसाठी सारखेच लागू,अशी राज्यव्यवस्था निर्माण झाली. आखिल भारतीय कीर्तीच्या गागाभट्टांनी या समारंभात सहभाग घेतल्याने त्यात तांत्रिक संकुचितपणास वाव राहिला नाही. निरनिराळ्या सुलतानशाह्या, इंग्रज,फ्रेंच,डच व पोर्तुगीज यांचे शिवरायांबद्दल विविध समज होते.या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाने त्यांच्या शिवाजी महाराजांविषयक समजुती धादांत खोट्या ठरल्या व शिवरायांना राजसत्तेची मान्यता मिळाले. गोवळ कोंड्याच्या कुतुबशहाने त्यांचा सन्मान केला. तसेच हिंदू राजांना हिंदू देखील 'राजा' होऊ शकतो ही प्रेरणा मिळाली. लग्नाशिवाय संसार व्यर्थ आहे,त्याप्रमाणे राज्याभिषेकाशिवाय 'राजे' व 'स्वराज्य व्यर्थ ठरते म्हणून शिवरायांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.राज्याभिषेक केला धर्मसत्तेची मान्यता प्राप्त केली, अन् शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्रात नवयुग अवतरले.त्यामुळेच शिवरायांचा 'जन्मोत्सव' व 'राज्याभिषेक उत्सव' 'लोकोत्सव' बनला आहे. अशा या महान राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा!!! 
                                         

                                          श्री लोमटे अविनाश राजेंद्र* 
                                         *सहशिक्षक,उस्मानाबाद*
                                         *भ्र ध्वनी क्र* 9422007953

आयुष्‍य म्‍हणजे एक चित्रपटच

 


आयुष्‍य म्‍हणजे चित्रपटंच !

 

श्री.लोमटे अविनाश राजेंद्र

                                                    सहशिक्षक, जि.प.प्रा.शा.श्रीराम तांडा,

                                                                         ता.मंठा जि.जालना

                                                मो.नं.9422007953 / 9834005825

------------------------------------------------------------------

आपल्‍या वाट्याला आलेलं आयुष्‍य म्‍हणजे एक चित्रपटच वाटतो मला. चित्रपट जसा एका कथेभोवती फिरत असतो तसं आपलं आयुष्‍यही प्रत्‍येक क्षणी एखाद्या कथेभोवती फिरताना आपण अनुवत असतो. अनेक पात्रं आपण वठवत असतो. त्‍या त्‍या प्रसंगानुसार आपल्‍या अवती-भोवतीच्‍या लोकांशी आपण बोलत असतो. कधी खरं कधी खोटं वागत असतो. प्रसंग बदलला की आपलं पात्रं बदलतं, भूमिका बदलते, अभिनयही बदलतो. कधी नायकाच्‍या तर कधी खलनायकाच्‍या भूमिकेत वावरावं लागतं. फारच मजेशीर वाटतं मला हे सगळं.

घरात असतांना कर्त्‍या पुरूषाची भूमिका आपण करत असतो. कुणाला काय हवं नको ते बघत असतो. घरातल्‍या प्रत्‍येकाची काळजी घेत असतो. त्‍यांच्‍या गरजा पूर्ण करण्‍याची जबाबदारी आपल्‍यावर असते. ती पार पाडणं हिच आपली तिथं भूमिका असते. तसाच अभिनय आपण करत असतो. आपल्‍या कुटुंबात आपण भावनेने गुंतलेले असतो, म्‍हणजे पत्‍नीशी मुलांशी किंवा आई-वडिलांशी वागताना आपली संवेदनशीलता पणाला लागलेली असते. इथला अभिनय अगदी सहजपणे आपल्‍यातून आपणच साकारत असतो. ही खुपच सुंदर आणि उत्‍कृष्‍ट गोष्‍ट वाटते मला.

घराबाहेर पडल्‍यानंतर जशी माणसं भेटतील तसं वागावं बोलावं लागते. त्‍याला आपण व्‍यवहार म्‍हणतो. तो चांगला पार पाडता आला की. आपल्‍याला व्‍यवहार जमला असं सगळे म्‍हणू लागतात. इथे खऱ्या-खोट्यापेक्षा प्रसंगाला निभावून नेणं महत्‍त्‍वाचं असतं. असा नियमच असतो जणू ह्या चित्रपटाचा. सण-उत्‍सवाच्‍या निमित्‍ताने तर आपण गर्दीमध्‍ये गुडूप होऊन जातो. अनेक नातलगं आपल्‍याभोवती रुंजी घालू लागतात. काही प्रेमाने बोलतात तर काही मनात आढी ठेवून वागतात. हे आपल्‍याला कळत असतं पण तरी आपण जुळवून घेत असतो. नातं टिकवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. तसा अभिनय तिथे करावाच लागतो आणि ती गरजही असते आपली.

साधारणतः आपल्‍याला भेटणारी रोजची माणसं अनुभवानं आपण वाचलेली असतात. म्‍हणून त्‍यांच्‍याशी कसं वागायचं हे आपण ठरवून टाकलेलं असतं. पण कधी कधी असाही अनुभव येतो की, माणसं बदलतात. वाईट वागतात. बहुतेक स्‍वार्थापोटी ते तसं करतात. पण मन अस्‍वस्‍थ होतं. वेदना होतात असं व्‍हायला नको होतं असं वाटत राहतं. जवळची माणसं अशा काही कारणांमुळे दुरावतात, कधी कधी तर कायमची दूर जातात. समज-गैरसमजातून हे असं होत असतं. पण मनाचा मोठेपणा दाखवून पुन्‍हा त्‍यांच्‍या जवळ जावं लागतं. माझाच गैरसमज झाला होता असं म्‍हणावं लागतं आणि पुन्‍हा त्‍यांच्‍याशी पहिल्‍यासारखंच वागावं लागतं. पण प्रत्‍येक वेळी हे जमेलच असं नाही. काही नाती पुन्‍हा जुळतात तर काही शेवटपर्यंत तुटलेलीच राहतात. त्‍यांच्‍याविषयी नेहमीच खंत वाटत राहते.

आयुष्‍याच्‍या ह्या चित्रपटामध्‍ये आईवडीलांच्‍या सहवासाइतकाच महत्‍त्‍वाचा आणि संवेदनशील प्रसंग हा आपल्‍या मित्रांसोबतचा असतो ते मनाने नेहमीच आपल्‍या सोबत असतात. मानसिक बळ देत असतात. सगळ्यात महत्‍त्‍वाचं पात्र म्‍हणजे आपली नायिका जी आपल्‍या पत्‍नीच्‍या भूमिकेत आपल्‍या सहवासात अहोरात्र असते आपल्‍या आईनंतर पुन्‍हा आईसारखीच सदैव आपली काळजी करणारी आपली खरीखुरी नायिका असते. तिच्‍याशिवाय चित्रपटच पूर्ण होत नाही.

आपण जिथे नोकरी व्‍यवसायाच्‍या निमित्‍ताने काम करत असतो तिथले काही नियम आपल्‍याला पाळावेच लागतात. आपले हितसंबंध जपावेच लागतात. प्रत्‍येकाच्‍या स्‍वभावानुसार समजून घ्‍यावंच लागतं. खरं तर गावाकडून ह्या इथे दूर नोकरीसाठी आपण आलेलो असतो. आपल्‍यासोबत काम करणारे किंवा आपण ज्‍यांच्‍यासोबत काम करतो, त्‍यांचं आणि आपलं नकळतपणे अतुट नातं निर्माण होऊन गेलेलं असतं. आपल्‍या लक्षातही येत नाही इतके आपण ह्या सगळ्यांच्‍या नात्‍यांमध्‍ये गुंतून गेलेलो असतो. इथे काही मित्र असे होतात की, त्‍यांच्‍या खाजगी आयुष्‍यात त्‍यांना आपली आणि आपल्‍याला त्‍यांची सारखी गरज भासायला लागते. आपल्‍यावर काही संकट आलं तर आधी हिच मंडळी घरच्‍यांसारखी धावून येतात. गावाकडंची मंडळी तर दूर असते. लगेच येऊ शकत नाही, पण हळूहळू त्‍यांची जागा ही आपल्‍यासोबतची मंडळी घेऊ लागते.

आपल्‍या भोवतीचं हे वलय कधी वाढलं हे कळतच नाही. वेगवेगळ्या प्रसंगानुसार खुप माणसं जोडली जातात. काही शिकवून जातात तर काही आपल्‍याकडून शिकतात. खुप भली माणसं भेटत राहतात. आपल्‍याला सहजच मदत करून जातात आणि त्‍याचा लवलेशही चेहऱ्यावर दिसत नाही. अशावेळी मन अगदी हळवं होतं. अजूनही जगात माणुसकी जिवंत आहे याची जाणीव होत राहाते. मग वार्इट माणसांची भीती वाटत नाही. एक नैतीक बळ आपल्‍यात येतं. ही अशी समविचारी माणसं मिळून आपण काही सामाजिक, सांस्‍कृतिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्‍यास सुरूवात करतो आणि पुन्‍हा असंख्‍य माणसांशी जोडल्‍या जातो. एक अलौकीक असं नातं ह्या सगळ्यांशी निर्माण होऊन जातं. आपल्‍याला काही कळतही नाही आपण हे काय केलं ते आणि पुन्‍हा एक नवा चित्रपट घेऊन जगासमोर आपण येतो.

 

                                                 श्री.लोमटे अविनाश राजेंद्र

                                                    सहशिक्षक, जि.प.प्रा.शा.श्रीराम तांडा,

                                                                         ता.मंठा जि.जालना

                                                मो.नं.9422007953 / 9834005825