माझे शैक्षणिक उपक्रम
Tuesday, September 8, 2020
Sunday, August 23, 2020
Saturday, August 22, 2020
माझ्या राजाचा नयनमनोहर राज्याभिषेक सोहळा
आयुष्य म्हणजे एक चित्रपटच
आयुष्य म्हणजे चित्रपटंच !
श्री.लोमटे अविनाश राजेंद्र
------------------------------
आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे एक चित्रपटच वाटतो मला. चित्रपट जसा एका कथेभोवती फिरत असतो तसं आपलं आयुष्यही प्रत्येक क्षणी एखाद्या कथेभोवती फिरताना आपण अनुवत असतो. अनेक पात्रं आपण वठवत असतो. त्या त्या प्रसंगानुसार आपल्या अवती-भोवतीच्या लोकांशी आपण बोलत असतो. कधी खरं कधी खोटं वागत असतो. प्रसंग बदलला की आपलं पात्रं बदलतं, भूमिका बदलते, अभिनयही बदलतो. कधी नायकाच्या तर कधी खलनायकाच्या भूमिकेत वावरावं लागतं. फारच मजेशीर वाटतं मला हे सगळं.
घरात असतांना कर्त्या पुरूषाची भूमिका आपण करत असतो. कुणाला काय हवं नको ते बघत असतो. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत असतो. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. ती पार पाडणं हिच आपली तिथं भूमिका असते. तसाच अभिनय आपण करत असतो. आपल्या कुटुंबात आपण भावनेने गुंतलेले असतो, म्हणजे पत्नीशी मुलांशी किंवा आई-वडिलांशी वागताना आपली संवेदनशीलता पणाला लागलेली असते. इथला अभिनय अगदी सहजपणे आपल्यातून आपणच साकारत असतो. ही खुपच सुंदर आणि उत्कृष्ट गोष्ट वाटते मला.
घराबाहेर पडल्यानंतर जशी माणसं भेटतील तसं वागावं बोलावं लागते. त्याला आपण व्यवहार म्हणतो. तो चांगला पार पाडता आला की. आपल्याला व्यवहार जमला असं सगळे म्हणू लागतात. इथे खऱ्या-खोट्यापेक्षा प्रसंगाला निभावून नेणं महत्त्वाचं असतं. असा नियमच असतो जणू ह्या चित्रपटाचा. सण-उत्सवाच्या निमित्ताने तर आपण गर्दीमध्ये गुडूप होऊन जातो. अनेक नातलगं आपल्याभोवती रुंजी घालू लागतात. काही प्रेमाने बोलतात तर काही मनात आढी ठेवून वागतात. हे आपल्याला कळत असतं पण तरी आपण जुळवून घेत असतो. नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तसा अभिनय तिथे करावाच लागतो आणि ती गरजही असते आपली.
साधारणतः आपल्याला भेटणारी रोजची माणसं अनुभवानं आपण वाचलेली असतात. म्हणून त्यांच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवून टाकलेलं असतं. पण कधी कधी असाही अनुभव येतो की, माणसं बदलतात. वाईट वागतात. बहुतेक स्वार्थापोटी ते तसं करतात. पण मन अस्वस्थ होतं. वेदना होतात असं व्हायला नको होतं असं वाटत राहतं. जवळची माणसं अशा काही कारणांमुळे दुरावतात, कधी कधी तर कायमची दूर जातात. समज-गैरसमजातून हे असं होत असतं. पण मनाचा मोठेपणा दाखवून पुन्हा त्यांच्या जवळ जावं लागतं. माझाच गैरसमज झाला होता असं म्हणावं लागतं आणि पुन्हा त्यांच्याशी पहिल्यासारखंच वागावं लागतं. पण प्रत्येक वेळी हे जमेलच असं नाही. काही नाती पुन्हा जुळतात तर काही शेवटपर्यंत तुटलेलीच राहतात. त्यांच्याविषयी नेहमीच खंत वाटत राहते.
आयुष्याच्या ह्या चित्रपटामध्ये आईवडीलांच्या सहवासाइतकाच महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रसंग हा आपल्या मित्रांसोबतचा असतो ते मनाने नेहमीच आपल्या सोबत असतात. मानसिक बळ देत असतात. सगळ्यात महत्त्वाचं पात्र म्हणजे आपली नायिका जी आपल्या पत्नीच्या भूमिकेत आपल्या सहवासात अहोरात्र असते आपल्या आईनंतर पुन्हा आईसारखीच सदैव आपली काळजी करणारी आपली खरीखुरी नायिका असते. तिच्याशिवाय चित्रपटच पूर्ण होत नाही.
आपण जिथे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने काम करत असतो तिथले काही नियम आपल्याला पाळावेच लागतात. आपले हितसंबंध जपावेच लागतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार समजून घ्यावंच लागतं. खरं तर गावाकडून ह्या इथे दूर नोकरीसाठी आपण आलेलो असतो. आपल्यासोबत काम करणारे किंवा आपण ज्यांच्यासोबत काम करतो, त्यांचं आणि आपलं नकळतपणे अतुट नातं निर्माण होऊन गेलेलं असतं. आपल्या लक्षातही येत नाही इतके आपण ह्या सगळ्यांच्या नात्यांमध्ये गुंतून गेलेलो असतो. इथे काही मित्र असे होतात की, त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांना आपली आणि आपल्याला त्यांची सारखी गरज भासायला लागते. आपल्यावर काही संकट आलं तर आधी हिच मंडळी घरच्यांसारखी धावून येतात. गावाकडंची मंडळी तर दूर असते. लगेच येऊ शकत नाही, पण हळूहळू त्यांची जागा ही आपल्यासोबतची मंडळी घेऊ लागते.
आपल्या भोवतीचं हे वलय कधी वाढलं हे कळतच नाही. वेगवेगळ्या प्रसंगानुसार खुप माणसं जोडली जातात. काही शिकवून जातात तर काही आपल्याकडून शिकतात. खुप भली माणसं भेटत राहतात. आपल्याला सहजच मदत करून जातात आणि त्याचा लवलेशही चेहऱ्यावर दिसत नाही. अशावेळी मन अगदी हळवं होतं. अजूनही जगात माणुसकी जिवंत आहे याची जाणीव होत राहाते. मग वार्इट माणसांची भीती वाटत नाही. एक नैतीक बळ आपल्यात येतं. ही अशी समविचारी माणसं मिळून आपण काही सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्यास सुरूवात करतो आणि पुन्हा असंख्य माणसांशी जोडल्या जातो. एक अलौकीक असं नातं ह्या सगळ्यांशी निर्माण होऊन जातं. आपल्याला काही कळतही नाही आपण हे काय केलं ते आणि पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन जगासमोर आपण येतो.